शेतकऱ्यांचे थकीत न दिल्याने सोलापुर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांवर जप्ती



सोलापूर : उसाच्या थकीत एफआरपीप्रश्‍नी सोलापूर जिल्ह्यातील श्री सिद्धेश्‍वर सहकारी आणि भीमा (टाकळी) सहकारी साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्राप्रमाणे (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी दिले आहेत. या दोन्ही कारखान्यांची मिळून ५४ कोटी ११ लाख ७५ हजार रुपये थकीत एफआरपी ही विहित दराने होणाऱ्या व्याजानुसार वसूल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने हंगाम २०१७-१८ मध्ये ७ लाख ४५ हजार ७५४ मे. टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. शेतकऱ्यांच्या उसाची निव्वळ एफआरपी प्रमाणे ४१ कोटी ४८ लाख ४२ हजार रुपये थकीत ठेवले आहेत. तसेच मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर भीमा (टाकळी) सहकारी साखर कारखान्याने ४ लाख ११ हजार ८७६ मे. टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. या कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाच्या एफआरपीचे १२ कोटी ६३ लाख ३३ हजार रुपये थकीत ठेवले आहेत. त्यामुळे दोन्ही कारखान्यांनी ऊस नियंत्रण १९६६ मधील तरतुदीचे उल्लंघन केले असल्याचे समोर आले आहे.
याबाबतच्या सुनावणीवेळी दोन्ही कारखान्यांनी थकीत एफआरपीची रक्कम देण्याचे कबूल केले होते. रक्कम भरण्याची लेखी हमीदेखील दिली होती. तरीही थकीत एफआरपी रकमेचा भरणा न केल्याने दोन्ही कारखान्यांवर जप्ती आदेश काढण्यात आले आहेत. थकीत एफआरपीच्या रकमा जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने आणि उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस इत्यादी उत्पादनाची विक्री करून रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या स्वतःच्या जंगम व स्थावर मालमत्तेची विहित पध्दतीद्वारे विक्री करुन या रक्कमेतून शुगरकेन कंट्रोल ऑर्डर १९६६ मधील तरतुदीनुसार देयबाकीची रक्कम खात्री करुन संबंधित शेतकऱ्यांना देण्यात यावी, असेही आदेशात पुढे म्हटले आहे.

Comments