दुधाला पाच रुपये दर वाढ मिळालीच पाहिजे : खासदार शेट्टी

 

दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ मिळण्यासाठी १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून राज्यभर सुरू होणाऱ्या दूध संकलन बंद आंदोलनात खासगी डेअरीचाही समावेश आहे. डेअरीचालकांनी संकलन बंद न ठेवल्यास आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत  दिला.
राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दुधाच्या प्रश्नावर सरकारला संधी दिल्यास प्रश्न सुटेल, असे सांगितले आहे. मात्र, आम्ही दीड वर्षांपूर्वीच केंद्रीय कृषिमंत्र्यांना दूध पावडरच्या घसरलेल्या दराची कल्पना दिली होती. मुख्यमंत्र्यांनादेखील सहा महिन्यांपूर्वीच भेटून माहिती दिल्यानंतरदेखील काही झाले नाही. त्यामुळे पटेल यांचा भाबडा आशावाद आता उपयोगाचा नाही. त्यामुळे आंदोलन होणारच, असे खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले.
दूध संकलन बंद आंदोलनात परराज्यांतूनदेखील दूध येऊ दिले जाणार नाही. ‘‘आम्ही राज्याच्या सर्व सीमा अडविणार आहोत. कायदा हातात घेऊन आम्ही दुधाची वाहतूक रोखू. आंदोलन काळात दुधाची नासाडी न करता गरिबांना, शालेय विद्यार्थ्यांना तसेच वासरांना दुध देण्याचे आवाहन आम्ही केले आहे. खासगी संकलनदेखील बंद राहणार असल्यामुळे पाच रुपये दरवाढ दिल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही,’’ असेही श्री. शेट्टी म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी कर्जमुक्ती व उत्पादन खर्च्याच्या दीडपट भाव असे दोन विधेयक आपण संसदेत मांडणार आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत फसवाफसवी केली जात असून, आम्ही जनतेसमोर या सरकारची सर्व बनवेगिरी पुराव्यासहित मांडणार आहोत, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
राज्यात एफआरपी चुकीच्या पद्धतीने
देशात पुढील हंगामात उसाची एफआरपी साडेनऊ टक्क्यांपर्यंत २७५० रुपये करून करून पुढील एका टक्क्याला २८९ रुपये करण्याचे घाटत आहे. मात्र, एक टक्का वाढीव वाढविताना तळटप्पा मात्र साडेनऊऐवजी दहा टक्क्यांपर्यंत करण्याचा डाव केंद्र सरकारचा आहे. आम्ही हे कदापि होऊ देणार नाही, असा इशारा देत खासदार शेट्टी म्हणाले, की राज्यातील साखर कारखान्यांनादेखील एफआरपी चुकीच्या पद्धतीने दिली जात असून, त्याची माहिती आम्ही घेणार आहोत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ड्रीम नेशन इंडिया आधुनिक शेतीविषयक  मासिक फक्त १२०० रुपये मध्ये आपणास ३ वर्षे म्हणजे ३६ मासिक प्रती मिळतील तसेच त्यावर प्रकाशन प्रथम वर्ष ऑफर म्हणून आमची #Dreams_Krushi_Samrat#Dreams_Soil_Samrat हि ICAR प्रमाणित सेंद्रिय उत्पादने मोफत मिळतील.मासिक सुविधा सुरु करण्यासाठी संपर्क +९१ ७३७८७६९०९९ 

Comments