मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाचा पहीला बळी !



मराठा  क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाचा पहीला बळी आज औरंगाबाद इथे गेला.   मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील आंदोलनाने आज आक्रमक स्वरूप घेतले. आज दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान औरंगाबाद – नगर रोडवरील कायगाव येथे गोदावरी पात्रावरील पुलावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी एका व्यक्तीने गोदावरी पात्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
काकासाहेब शिंदे (रा. नागड कानडगाव, गंगापूर ) असे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी नगर रोडवरील कायगाव येथील गोदावरी पात्रात उडी घेतली होती. त्यांना काही मच्छीमारांनी पात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
गंगापूर तालुक्यातील सकल मराठा समाजातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले होते. यात त्यांनी सोमवारी कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून उडी मारून सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. तो या आत्महत्येने प्रत्यक्षात आला. आता तरी सरकार जागे होणार का असा प्रश्न मराठा समाज विचारतोय.

Comments