:
“दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर देण्यासाठी किमान आधारभूत दराचा कायदा करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. याद्वारे ऊसपिकाप्रमाणेच ७०:३० टक्क्याच्या गुणोत्तराचा अवलंब करण्याचा सरकारचा विचार आहे. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच्या उपाय योजनांची अंमलबजावणी तात्काळ केली जाईल,” अशी ग्वाही पशूसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने दूध दर व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जानकर यांची भेट घेतली. त्यावेळी जानकर यांनी या शिष्टमंडळाला हे आश्वासन दिले आहे.
दुधाचा उत्पादन खर्च निश्चित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ तसेच दूध उत्पादकांचे प्रतिनिधी घेण्यात येतील. या सर्वांकडून सूचना मागविण्यात येऊन दुधाचा किमान उत्पादन खर्च निश्चित करण्यात येईल. त्यानुसार शेतकऱ्यांना दर मिळावा यासाठी शासन उपाय योजना करेल. ३.५ ते ८.५ हे फॅट व एसएनएफचे प्रमाण असतानाही शासनाने ठरवून दिलेला दर न दिलेल्या सहकारी दूध संघांवर कारवाई सुरू असून काही संघांकडून फरकाची वसुली करण्यात आली आहे. हा फरक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही जानकर यांनी यावेळी सांगितले आहे.
तसेच जानकर पुढे बोलताना म्हणाले की, “दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी (स्कीम्ड मिल्ड पावडर) करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेतला आहे. यामुळे दूध भुकटी प्रकल्पधारक शेतकऱ्यांकडून अधिक दूध खरेदी करुन दरही चांगला देऊ शकतील.”
Comments
Post a Comment