नवी दिल्ली: अर्थसंकल्पापूर्वीच सरकारने लहान व्यापारी आणि करदात्यांना दिलासा देताना २९ वस्तूंवरील आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरांमध्ये कपात केल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.
यामध्ये प्रामुख्याने कृषिकिंगने वेळोवेळी दिलेल्या माहितीनुसार, "बायो डिझेल आणि वेगवेगळ्या सेंद्रीय खतांवरील जीएसटी १८ टक्क्यावरुन १२ टक्के करण्यात आला आहे. तर शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी सिंचनासंबंधीची काही उपकरणे आणि यंत्रांवरील जीएसटी १८ टक्क्यावरुन १२ टक्के करण्यात आला आहे."
बदललेले जीएसटी दर हे २५ जानेवारीपासून लागू होणार असून, पेट्रोलियम पदार्थदेखील जीएसटीच्या कार्यकक्षेत आणण्यात येणार आहे. जीएसटी परिषदेची महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली. त्यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली आहे.
जीएसटी दरात कपात करण्यात आलेल्या २९ वस्तूंमध्ये जैविक खते, ठिबक सिंचनाच्या उपकरणांसह बाटलीबंद पाणी, जैविक इंधन, मेहंदीचे कोन, खासगी वितरकांकडून पुरवठा होणारे एलपीजी सिलिंडर, शास्त्रीय आणि तांत्रिक उपकरणे, हिरे आणि मौल्यवान खडे यांचा समावेश आहे.

Comments
Post a Comment