बीड: “दूध संघाकडून दुधाला प्रतिलिटर १८ रुपये भाव दिला जात असून यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चसुध्दा निघत नाही. त्यामुळे उत्पादन आणि खर्चावर आधारित दुधाला भाव देण्याचे धोरण आणण्याची गरज आहे. त्यासाठी ऊसाप्रमाणेच दुधालाही एफआरपीप्रमाणे भाव देण्याची गरज आहे. यासाठी एफआरपीप्रमाणे कायदा करण्याची गरज आहे. दुधातील दादागिरी मोडून काढण्याचे काम आता मुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्र्यांनी केले पाहिजे. यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा आणून त्या अगोदर शासनाने अध्यादेश काढला नाही. तर राज्यात शिवसंग्रामच्या वतीने आंदोलन करू,” असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी दिला आहे.
“सध्या राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला १७ ते १८ रुपये भाव मिळत आहे. यातून चारा, वैरण, पेंड, पाणी याचाही खर्च निघत नाही. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. पूर्वी दुधातून एक ते दोन रुपये मिळणारा नफा सध्या वाढला असून दूध संघांना लिटर मागे दहा रुपये मिळू लागले आहेत. स्वत: पाऊच विकणारे आज मालामाल झाले आहेत. ही शेतकऱ्यांची लूटच आहे. दूध उत्पादकातील दादा लोकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी वेसन घातले पाहिजे,” असेही मेटे म्हणाले आहेत.
“दुधासाठी कायदा अस्तित्वात यावा. अर्थसंकल्पीय अधिवेशनात बिल मांडले गेले पाहिजे. पंधरा दिवसांपूर्वी याचा अध्यादेश निघाला पाहिजे. यासाठी शिवसंग्रामचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री व दुग्ध मंत्र्यांना भेटणार असून मागण्या मान्य न झाल्यास राज्यात शिवसंग्रामच्या वतीने आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा मेटे यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment