बरीच जनावरे गाभण राहिल्यानंतर ५ ते ७ महिन्यांत अाटतात. दूध उत्पादन बंद झाल्यामुळे खाल्लेल्या अतिऊर्जायुक्त खाद्याचे फॅटमध्ये रूपांतर होऊन त्याचा शरीरात साठा होऊन अतिलठ्ठपणा येतो.
बऱ्याच शेतकऱ्यांकडे एक किंवा दोनच जनावरे असतात. अशा जनावरांना जास्त प्रमाणात केवळ गहू, मका, ज्वारी भरडून दिली जाते किंवा पीठ जास्त प्रमाणात दिले जाते. त्यामुळे जनावरे अतिलठ्ठ होण्याचे प्रमाण वाढते. जनावर दिसायला सशक्त, गोल दिसते; परंतु त्याच्या उत्पादन क्षमतेवर, प्रजोत्पादनावर त्याचे अनिष्ट परिणाम होतात. विशेषतः भाकडकाळ व दूध देण्याच्या शेवटच्या काळातील जास्त ऊर्जायुक्त अाहारामुळे जनावरांचे अतिपोषण होऊन लठ्ठपणा येतो. याच काळात अाहारातील प्रथिनांच्या कमी प्रमाणामुळे ही समस्या अजून वाढते.
जास्तीचे फॅट जनावर विल्यानंतर यकृताकडे जाते त्यामुळे यकृतामध्ये जास्तीचे फॅट जमा होऊन फॅटी लिव्हर सींड्रोम तयार होतो. त्यामुळे कॅल्शिअमची कमतरता, ॲसिटोनेमीया तसेच विल्यानंतरच्या समस्यांमध्ये वाढ होते. उदा. कासदाह अाजार.
अतिलठ्ठपणाची लक्षणे
- ज्या गायी गाभणकाळात किंवा वितेवेळी अतिलठ्ठ, जाड असतात त्यांच्यामध्ये विल्यानंतर कॅल्शिअमच्या कमतरतेची लक्षणे अढळतात. अशा प्रकारे उद्भवणाऱ्या कॅल्शिअमच्या कमतरतेमध्ये जनावर उपचारांना लवकर प्रतिसाद देत नाही.
- अतिलठ्ठ गायीमध्ये विल्यानंतर जास्त प्रमाणात भूक मंदावल्यामुळे कितनबाधाची लक्षणेसुद्धा उद्भवतात. कितनबाधेवर उपचार करूनही जनावराकडून सहजासहजी प्रतिसाद मिळत नाही.
- काही जनावरांमध्ये दूध उत्पादन अचानक कमी होते. गर्भाशयदाह, कासदाह, लंगडणे यांसारख्या समस्याही जास्त प्रमाणात अाढळतात.
- विल्यानंतर ३ ते ४ अाठवड्यांमध्ये लगेच शरीरप्रकृती एकदम खालावते. त्यामुळे जनावरांमध्ये माजावर न येणे, मुका माज यासारख्या समस्याही उद्भवतात; तसेच दूध देण्याचा काळही कमी होतो.
निदान
- ही समस्या अतिपोषित गायींमध्ये पूर्ण कळपामध्ये असू शकते किंवा ज्या गायी प्रबळ अाहेत त्या दुसऱ्या गायींचाही जास्तीचा चारा खातात व त्या अतिलठ्ठ होतात.
- योग्य निदान होण्यासाठी रक्तातील शर्करा तपासणी, स्निग्ध अाम्लांचे प्रमाण तपासणे, लिव्हर बायोप्सी करून करता येते.
नियंत्रण
- जनावरातील दूध देण्याच्या शेवटच्या टप्प्यात व भाकडकाळात ऊर्जेचे प्रमाण नियंत्रित करून संतुलित पशुखाद्य, अाहार द्यावा.
- सर्व जनावरांना वयानुसार, दूध उत्पादन काळ, गाभण काळ, भाकडकाळ यानुसार वेगवेगळे गट तयार करून शरीर गरजेनुसार संतुलित अाहार द्यावा.
संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Comments
Post a Comment