शेतमालाच्या हमीभावासाठी दक्षता घ्यावी : नवल किशोर राम



औरंगाबाद : शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा म्हणून आधारभूत किंमत खरेदी योजना राबविण्यात येत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने भरडधान्याची खरेदी होणार नाही, याची दक्षता पथकांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. ८) पणन हंगाम २०१७-१८ मध्ये किमान आधारभूत किमतीने  खरेदी योजनेचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम, जिल्हा उपनिबंधक एस. बी. खरे,  जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे, बाजार समितीचे सचिव, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींची उपस्थिती होती.
श्री. खाडे म्हणाले, भरडधान्य खरेदी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सातबाराची पीक पेऱ्यासह नोंदणी करणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यात दहा ठिकाणी खरेदी विक्री संघांना मंजुरी देण्यात आली आहे. ऑनलाइन खरेदीकरिता NEML NCDEX Group Company यांच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावयाची आहे.
यामध्ये करमाड, पैठण फुलंब्री, वैजापूर, गंगापूर, लासूर स्टेशन, सोयगाव, सिल्लोड, कन्नड, आणि खुलताबाद खरेदी विक्री संघाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, हमीभावापेक्षा कमी दराने भरडधान्याची खरेदी होणार नाही याची दक्षता पथकांनी घ्यावी. जिल्हा उपनिबंधक कार्यालयानेही अचानक भेटी देऊन पाहणी करावी.

Comments